मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

दलित साहित्य

दलित साहित्य प्रेरणा आणि विद्रोह बांधिलकीचा

दलित साहित्य मनोरंजनासाठी नाही. शोषीत समाजाला पारंपरिकतेच्या बंधनातून मूक्त करणे हा त्या मागचा उद्देश आहे. त्यामूळे दलित साहित्यात भावनाभिव्यक्ती नाही तर विचार आहे. हे विचारच दलित साहित्यात भावनेचे रुप धारण करतात. दलित साहित्याच्या प्रेरणास्थानी तथागत गौतम बुध्द, म. ज्योतिराव फुले, कार्ल मार्क्स आणि मुख्यत्वे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत.
    बौध्द विचार सामाजिक क्रांतीचा आणि परिवर्तनाचा विचार आहे. बौध्द तत्वज्ञानच बुध्दीवादावर व तर्कावर आधारित आहे. समता, व्यक्ती स्वातंत्र्य, अहिंसा, शांती आणि सत्य यांचाही ह्या तत्वज्ञानात सामावेश आहे.
कार्ल मार्क्सने समाजवादाचा पुरस्कार केला. साम्यवादामूळे स्त्री-पुरुषांना त्यांचा विकास साधता येतो. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. दलित साहित्यातून आढळून येणारा नकार आणि विद्रोह म्हणजे मार्क्सच्या आदर्श समाज व्यवस्थेच्या कल्पनांना मूर्तरुप देण्यासाठी चालविलेल्या संघर्षाची प्रधान सूत्रे होय. दलित साहित्यात दारिद्रय , भूक , समाजव्यवस्थे विरुध्द बंडाची भाषा येते,याचे मूळ कारण डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेली मार्क्स विचार सरणी होय. म. फुलेंनीही मानसिक व सामाजिक गुलामगिरी विरुध्द बंड केले.समता, बंधुता यांचा पुरस्कार केला. दलित साहित्य हे आत्मा, परमात्मा , अध्यात्म, वर्ण, जाती व्यवस्था यांना नकार देते. हिंदू परंपरा, वाईट चालीरीती , यांच्या विरुध्द बंड पुकारते हा विचार  डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीमधून आलेला आहे.
   त्यांनी दलितांना बलुतेदारी सोडून स्वातंत्र्य जीवन जगण्याचा उपदेश केला. मानव मुक्ती, स्वातंत्र्य , समता, बंधुता, न्याय यांचा पुरस्कार केला. दलितांच्या मनात आत्मसन्मान , आत्मविश्वास, आत्मावलंबन यांची जानीव निर्माण करुन दिली.जो धर्म वर्तमान समृद्ध करण्यासाठी माणसाला प्रोत्साहन देतो, जो त्याच्या मनात आशा पल्लवीत करतो व फुलवितो तोच खरा धर्म. लोकशाही, समाजवाद, आणि बुध्दविचारप्रणाली हाच आंबेडकरी विचारांचा गाभा आहे. दलित साहित्यातून डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान मोठ्या प्रमाणात येते. समाजसुधारनेसाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व मानसिक स्तरावर परिवर्तन घडून येणे आवश्यक आहे.या साठी सम्यक क्रांती व्हावी लागते. ती घडवायची असेल तर विद्रोहाची गरज आहे. म्हणून दलित साहित्यात विद्रोह येतो.मानवतेसाठीचा हा विद्रोह आहे दलित साहित्य अज्ञान , दारिद्रय , पिळवणूक यांना नकार देते. वर्णव्यवस्थेमध्ये, जातीव्यवस्थेमध्ये मानवी मूल्यांचे अवमूल्यन होते. म्हणून या साहित्याने वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था नाकारली आणि माणूस महान आहे हे सूत्र स्वीकारले. ते माणसाला केंद्रबिंदू मानते, त्याची बांधिलकी मणुष्यत्वाची प्रतिष्ठा मानणाऱ्या तत्वप्रणालीशी आहे.

   १९५८साली मुंबई येथे पहिले दलित साहित्य संमेलन भरले. त्या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी 'हि पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या तळहातावर तरली आहे' असे विधान केले. याच संमेलनात मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात दलित लेखकांचे दलितांविषयीचे साहित्य यांचा दलित साहित्य म्हणून स्वतंत्र विभाग मानन्यात यावा असा ठराव पास करण्यात आला.

दलित शब्दाची व्युत्पत्ती

डाॕ. भालचंद्र फडके यांच्या मते, " दलित शब्दाची व्याख्या सर्वसमावेशक करणे फारसे योग्य ठरणार नाही. कारण दलित या शब्दामागे एक महत्वाची कल्पना आहे. हिंदू धर्माने आणि सामाजिक रुढींने ज्यांना आजवर बहिष्कृत मानले त्या माणसांना डाॕ. बाबासाहेबांच्या मुक्तीसंग्रामात नवी शक्ती लाभली आणि त्याला आपले मूल्यवान अनूभव व्यक्त करण्याची संधी लाभली. हा दलित वर्ग भारताचा पुराण, मूक, आणि अदृश्य पुरुष होता."
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात, "मानवी प्रगतीत सर्वात मागे राहिलेला , रेटलेला सामाजिक वर्ग म्हणजे दलित."
     डाॕ. भालचंद्र फडके दलित साहित्याचे अभ्यासक आहेत, त्यांच्या मते सर्वसमावेशक शोशीत समाज दलित म्हणता येणार नाही कारण भारताततील हिंदू संस्कृती व रुढी परंपरेमूळे, वर्णव्यवस्थेमूळे ज्यांना सामाजिक प्रगतीत मागे ठेवले गेले यात दलित या शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते. डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मपरिवर्तन असेल किंवा काळाराम मंदिर प्रवेश चळवळ, महाडचा सत्याग्रह ह्या मानवी मुक्ती संग्रामातून ज्यांना शक्ती मिळाली. हा वर्ग जागृत झाला ज्यांना आत्मभान मिळाले ते दलित.
  लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते, मानवी प्रगतीत सर्वात मागे राहिलेला वर्ग मग तो कोणी का असेना तो दलिता. पण याचा संदर्भही भारतीय समाज व्यवस्थे संदर्भातच घ्यावा लागेल.
जात्यात दळले गेलेले भरडलेले ते दळीत=दलित असाही अर्थ पाहवयास मिळतो. हे भरडणे दळणे भारतीय समाजव्यवस्थे संदर्भात घ्यावे लागते.
त्या संदर्भात लोकसाहित्याचे आभ्यासक डाॕ. प्रभाकर मांडे त्यांच्या 'दलित साहित्याचे निराळेपण' ह्या ग्रंथात सांगतात,"आपण येथे लक्षात घेतले पाहिजे की, दलित हा शब्द proletariat याचा अर्थ वर्ग वाचक किंवा केवळ जातीवाचकही नाही. दलित म्हणजे एक विशिष्ट सामाजिक स्थिती अनुभवित असलेला समूह किंवा समाजगट. भारतातील समाजव्यवस्थेत या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे."
तर डाॕ. गो. म. कुलकर्णी म्हणतात,"तळागाळात रुतून बसलेला सर्वच उपेक्षित समाज म्हणजे दलित समाज."
तर कवी नामदेव ढसाळ यांच्या मते, "दलित म्हणजे अनुसूचित जाती-जमाती, बौध्द, कष्टकरी जनता, कामगार, भूमिहीन शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जमाती, आदिवासी इत्यादी."
     नामदेव ढसाळ दलित ह्या संकल्पनेत सर्व शोषीत कामगार, शेतकरी, भटक्या जमाती , आदिवासी यांचा समावेश करतात.

दलित साहित्यात दलितांच्या जीवनाचे चित्रण येते . परंतु दलितांच्या जीवनाचे चित्रण आले म्हणून ते दलित साहित्य होईल का? तर साहित्याचे वेगळेपण व्यक्त होणाऱ्या जानीवेत असते.

दलित जाणिवा
डाॕ. भालचंद्र फडके यांच्या मते, " दलितेत्तर लेखक आणि दलित लेखक यांच्या अनुभव घेण्याच्या शक्तीतच फरक आहे. दलित्तेतरांचा अनुभव संकल्पनात्मक आहे, तर दलित लेखकांचा अनुभव संवेदनात्मक असतो. एखिदे नाटक वाचणे आणि तेच नाटक प्रयोग रुपात पाहणे यात फरक असतोच . तसेच दलित लेखकाचे लेखन हा एक जीवंत अनुभव आहे.दलितेतर लेखकांनी जे लिहिले ते तितके उत्कट नसणे, जीवंत नसणे स्वाभाविकच आहे. म्हणून दलित साहित्यात आकारास येते, ते दलित लेखकाचे जग .हे जग त्यांचे स्वतःचे आहे. ते त्यांनी भोगलेले आहे. त्या जगातच ते वाढले आहेत.दलित साहित्यातील वेगळेपणा आमूक एका जातीतील लेखकाने लिहिले यात नसतो किंवा समूहाचे जीवन निवडले यातही नसतो किंवा विशिष्ट पोज घेऊन लिहिले यातही नसतो, तर तो दलितपणा माणसाच्या मुक्तीचा पुरस्कार करण्यात आहे, त्याला महान म्हणण्यात आहे. वंश, वर्ण व जातिश्रेष्ठत्वाला कडाडून विरोध करण्यात आहे."
या संदर्भात शरदचंद्र मुक्तीबोध म्हणतात, " दलित असणे व दलित जाणीव असणे हे भिन्न आहे. दलित जानीवेतून दलित जीवनविषयक जे वाड्•मय निर्माण होते ते, दलित वाड्•मय."
ह्या बाबत प्रा. कुमुद पावडे यांचे मत ही विचारात घेण्यासारखे आहे. त्या म्हणतात," माणुसकीच्या जगात माणसालाच प्रथम स्थान आसावं. पक्षी,मुंग्या, किडे, मासे, साप इत्यादी करुणेचे विषय दलितांच्या नंतर असावेत. माणुसकीची जानीव विसरलेल्या प्रेरणा बेगडी व हस्यास्पद असतात."

दलित साहित्याचे स्वरुप: बांधिलकी

दुःखाची तीव्रता कितीही असली तरी दलित साहित्य आशावादी आहे. कवी नारायण सुर्वे यांनी आपल्या सखीला केलेली मागणी याच उत्कट आशावादातून जन्म घेते.ते म्हणतात -
"याच वस्तीतून आपला सूर्य येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे
वेशीत अडखळतील ऋतू
तोवर प्रिये जागत राहिले पाहिजेच."

कुणाच्याही स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये. माणसाने माणसाला समानतेने वागवावे न्यायाने वागवावे. हिच ठाम अपेक्षा दलित साहित्यात प्रकट होते. नामदेव ढसाळ म्हणतात -
"माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला
पूर्ण अंशाने उध्दवस्त करुन घ्यावे
नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही
गुलाम करु नये लुटू नये
काळा गोरा म्हणू नये, तू ब्राम्हण तू क्षत्रिय
तू वैश्य तू शुद्र असे हिणवू नये
नाती न मानण्याचा
आय भैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये
आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी
मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे.
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी करडून खावा, माणसावरच सूक्त रचावे
माणसाचेच गाणे गावे माणसाने."

दया पवार म्हणतात -
"हे महाकवे ,
तुला महाकवी तरी कसे म्हणावे
हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा
एक जरी श्लोक तू रचला असतास....
....तर तुझे नाव काळजावर कोरुन ठेवले असते.
वरील काव्य रामायण महाकाव्य लिहीणा-या वाल्मिकी ऋषी बद्दल आहे.

अर्जुन डांगळे म्हणतात -
"जगत आहोत आम्ही इथे
जगावे लागते म्हणून
तर असे हे जिणे जगत असताना
ही महानगरी आमच्यावर खूष झाली
'बेकार' नावाची तिची प्रियतम
पदवी आम्हा बहाल केली."
वरील ओळीत सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न कवीने मांडला आहे.

गावकुसाबाहेरच्या माणसांच्या वाट्याला आलेले दुःख वामन निंबाळकर व्यक्त करतात.
"या गावकुसाबाहेरचे वाळलेले
चिरडलेले जीवन,
विषय झालाच नाही ,
तुमच्या कवितेचा."

श्री. ज. वि. पवार यांच्या काव्यात डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
"तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडाविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास
उभा बहिष्कृत भारत

पण पवारांच्या कवितेला मार्क्स नको आहे आंबेडकर हवे आहेत ते म्हणतात -
"तू म्हणतोयस मार्क्स हा दवा आहे
मी म्हणतोय ती एक दारु आहे
ही जातीयता फोड. हे बांध फोड
बांधाबांधातील पाणी घुसू दे,
तुझ्या बांधात, माझ्या बांधात."

'दिशा' या कविता संग्रहात ज्योती लांजेवार यांनी स्त्री मनाचे चित्र रेखाटले आहे. स्त्रीयांवर होत असलेल्या आत्याचारांबाबत त्या म्हणतात -
"हे कृष्णा ...तुझ्या राज्यात
आया बहिणींवर अत्याचार
अन् तू डोळे मिटावेसे असे पार...
अरे, अंगभर वस्त्रे पुरवू नकोस
पण वस्त्र ओढणारे ते हात
मूळापासून छाटून तरी टाक!"

वरील सर्व काव्य लेखन पाहता हे लक्षात येते, दलित साहित्यात विद्रोह आहे पण तो माणुसकीचा हक्क मागण्यासाठी. दलित साहित्य हि एक चळवळ आहे. त्या चळवळीतून जो संस्कृती, वर्णव्यवस्था जातीयतेने हक्क हिरावून घेतलेला आहे. तो माणुसपणाचा हक्क सनदशीर मार्गाने मागण्यासाठी दलित साहित्य चळवळही हातभार लावते. सामाजिक बांधिलकी हा विद्रोह जपतो. पण आजही हे भेद आणि माणुसकी संपली आहे का असा प्रश्न मनात घर करुन जातो.

लेखन/संकलन
#सोमनाथ_पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा