ज्योती हनुमंत भारती यांच्या कवितेतील स्त्रीवाद
कविता हे देखील जीवितयात्रेतील पाथेय आहे असे म्हणतात, ते काही खोटे नाही. आपण जे अनुभविले त्याचा आविष्कार कवितेतून करताना एक तृप्तता वाटते. स्त्रीने आपली सुखदुःखे, आशा-आकांक्षा व्यक्त केल्या त्या प्रथम कवितेतून. साने गुरुजी म्हणत की, स्त्रियांनी आपला आत्मा संपूर्णपणे ओतला, तो कवितेतून, कविता ही तिची सखी. जात्यावर दळताना, कांडताना, झोपाळ्यावर झोके घेताना कविता हीच तिची सहचारी होती, तिचे विश्व होते, चूल आणि मूल, माहेर आणि सासर, या विश्वात तिच्या वाट्याला कधी वेदना आल्या, कधी श्रावण सरीचे सुख आले. जे वाट्याला आले ते तिने कवितेच्या करंड्यात जपले. ही 'अपौरुषेय' कविता म्हणजे मराठी कवितेचे धन. एका मर्यादित विश्वात वावरत असणाऱ्या स्त्रीची कविता चित्त वेधून घेते. याचे कारण तिचा जन्म तिच्या जगण्यातून झालेला आहे. तिच्या विविध भावस्थितीचे चित्र या कवितेतून उमटत गेलेले आहे. लग्न, मुंज, बारसे, डोहाळे अगर नागपंचमी, गौरी-गणपती, नवरात्र इ. सण व उत्सवांच्या निमित्ताने स्त्रीचे दुथडी भरून आलेले मन कवितेतूनच गोचर होते.
प्राचीन मराठी कवितेची वाटचाल महानूभाव पंथ, वारकरी संप्रदाय ह्या मध्ये पहावयास मिळते. मग तिथे महदंबा गोविंदप्रभूच्या भक्तित तल्लीन होऊन 'धवळे' रचते, तर जनाबाई विठ्ठलासाठी अभंग रचना करते.
असा स्त्रीयांनी लिहीलेल्या काव्याचा वारसा आपल्याला प्राचीन काळापासून पहावयास मिळतो. तो अध्यात्माच्या रूपात.
कवितेची आणि स्त्री साहीत्य लेखनाची नाळ जोडणे ही पुरुषप्रधान संस्कृतीचेच द्योतक आहे. स्त्रीयांनी नाजुक कोमल भावच काव्यातुन का जोपासावेत? असा आधुनिक स्त्रीवादी साहीत्य समीक्षेला पडलेला एक प्रश्न आहे. ह्यातच स्त्रियांचे भाव विश्व गुरफुटन टाकणे स्त्री साहित्याकडे मनोरंजक म्हणून पाहणे ह्या पलिकडे वाचक व समीक्षकाची दृष्टीच जात नाही.
कविता लिहीणा-या कवींनी ही बंधने झुगारून द्यायला पाहिजेत.
पुरुषप्रधान संस्कृतीत स्रीला उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते. हाच दृष्टिकोन स्त्री साहित्यातुन पाहवयास मिळतो. ह्या बाबत एडवीन आर्डनर म्हणतात, 'गुढ, अप्रकाशित, अंधाऱ्या अती खासगी विभागातून (wild zone) तिची कलात्मक निर्मिती होणे आवश्यक आहे. यातच तिचे खरे अस्तित्व असते. तेथिल भाषा, तेथून निर्माण होणारी प्रतिमा यांनीच खरी स्त्री साहित्याची वीण बांधली गेली पाहिजे. आपल्या साहित्यामध्ये अस्सलपणा पाहिजे असेल तर wild zone कडे जाण्याशिवाय गत्यंतर नाही.'(संदर्भः साहित्य दर्शन -डाॕ. दिलीप गायकवाड )
ज्योती हनुमंत भारती ह्यांच्या काव्यातील स्त्रीवाद
ज्योती भारती ह्या कवयित्री मराठी कविता तसेच हिंदी भाषेतही काव्य लेखन करतात. त्यांच्या काव्य लेखना मागील प्रेरणा ज्ञानपीठ विजेत्या पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम असल्याचे सांगतात. शालेय जीवनापासूनच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला.
त्यांच्या मराठी कविता वाचकाच्या हृदयाला भीडतात.
त्यांच्या कवितांचा विषय प्रामुख्याने प्रेम भाव असला तरी त्यांच्या कवितातून सामाजिक जानीवही येते. पौराणिक राधा-कृष्ण, सीता, दुर्गा, चंडी, शिव अशा प्रतिकातून त्यांची कविता व्यक्त होत जाते.
राधाकृष्णातील आध्यात्मिक पातळीवरील समर्पन भाव त्यांच्या काव्यात पाहवयास मिळतो. त्या त्यांच्या एका काव्यात म्हणतात -
'राधा झाली कृष्ण
कृष्ण झाला राधा
कोणी कशी वर्णावी
ही सावळ्याची बाधा'
अशा प्रकारे राधाकृष्णातील अद्वैत भावाचा अपूर्व संगम घेऊन त्यांची प्रेम कविता अवतरते. अशा प्रकारचा अध्यात्मिक संदर्भ देणारी कविता इंदीरा संतांचीही पहावयास मिळते. येथे इंदीरा संतांशी तुलना करण्याचे कारण आध्यात्मिक प्रतिमांच्या साह्याने कविता लेखन करुन प्रथम इंदीरा संतांनी पारंपरिक काव्याचे वर्तुळ भेदले होते. तीच पुनरावृत्ती आजही होताना पाहवयास मिळते. त्या म्हणतात,
'अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकूळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ'
- इंदीरा संत(मृगजळ)
इंदीरा संत सांगतात 'मी मृगजळ ह्या काव्य संग्रहात मुक्तछंदाचा अधिक आश्रय घेतला, (छंदाचे हे वर्तुळ अगोदरच मुक्तेश्वराने भेदले होते.) कारण जशा भाव जानीवा संमिश्र, क्षोभकारक व सूक्ष्म होत जातील, तशी त्यांना ओवी व पादाकुलक ही वृत्ते मानवत नाहीत, असे मला दिसून आले.'
ज्योती भारती यांच्या काव्यातही वृत्त व छंदाचा जास्त वापर होत नाही. म्हणून ती काव्यलेखनाची काही मर्यादा नाही तर जिथे भावना तीव्र असतात तिथे वृत्ताच्या नियमांची गरजच काय? त्यांच्या काव्यातील भावच श्रेष्ठ ठरतात. अस्सल काव्याचा दर्जा त्या काव्याची वृत्तीच त्यांना बहाल करते.
दुसरी महत्वाची गोष्ट इथे नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे परंपरेनूसार स्त्रियांच्या भावभावना जशाचतशा प्रकट करणे हे सुध्दा पुरुषी वर्चस्व असणाऱ्या समाजात धाडसाचे काम आहे. ह्या बाबतीत लक्ष्मी बाई टिळकांचे अनुभव
एकदा त्यांनी कविता लिहिली व त्यांचे पति रागावतील म्हणून त्यांनी कागद चोळामोळा करून टाकला. टिळकांना वाटले ही आपल्या माघारी माहेरी पत्र लिहीत आहे पण टिळकांना ती कविता सापडली. १८९५ मध्ये टिळकांनी धर्मांतर केले. विचित्र परिस्थितीने घेरलेले त्यांचे मन कवितेला 'दुतिका' म्हणून संबोधू लागले. पति विरहामूळे एकटेपण आलेल्या लक्ष्मीबाईंचा विरहात कविता हाच विसावा होता.
ज्योती भारती यांच्या कविता त्यामानाने स्त्री मनातील भाव निर्भिडपणे व्यक्त करतात. हे ही त्यांचे सामर्थ्य स्थानच आहे.
त्यांची सखीला उद्देशून लिहीलेली एक कविता स्त्रिवादी साहित्याचा जणू आत्माच आहे. ती कविता 'नारी तू जगतेस का?' ह्या काव्यात म्हणतात -
'स्वप्नाच्या हिंदोळ्यावर
रोज निरंतर झूलतेस का?
लावून उपाध्या नात्यांच्या
बाईपणात मिरवतेस का?
आब राखत चालतानाही
नारी तू तुझी उरतेस का?
खरंच तू जगतेस का?'
ह्या ओळी सखीलाच नाही तर पुरुषांनाही विचार करण्यास प्रवृत्त करतात. जगणे म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा, बंगला, गाडी, सुंदर कपडे, मेकप म्हणजे जगणे का? पुरुषसत्ताक कुटुंब पध्दतीमध्ये पतिला ईश्वर मानले जाते, मग तो कसा का असेना. ह्यालाच संस्कार आणि संस्कृती म्हणतात मग ती ही कशी का असेना. पण स्त्रिवादी साहित्याला ह्या मर्यादा , वर्तुळे भेदण्याची गरज आहे. स्त्रियांच्या मनातील हळूवार भावभावनांचा आजही सुशिक्षित घरातही विचार केला जात नाही. एवढेच नाही तर स्त्रीच संस्काराचा बुरखा घेऊन ह्या भावना लपवत असतात.
तेच साहित्याच्या बाबतही लागू होते. एका हाडा मासाच्या शरीरात श्वास घेणे व सोडणे एवढीच क्रिया चालू राहते. स्वप्ने पाहण्यावरही पाप पुण्याचे बंधन येते.
कवयित्री म्हणतात केंव्हा ही स्त्री आई असते , केंव्हा बहिण, केंव्हा सून, एवढेच नाही तर प्रेयसी सुध्दा हे सर्व बंधनाचे नाते घेऊन ती जीवनाचा गाडा ओढत असते. नात्यांचा सांस्कृतिक धर्म पाळीत असते पण जगत नसते. नेमक्या ह्याच प्रश्नाला कवयित्री येथे वाचा फोडतात. हे त्यांच्या लेखनाचे सामर्थ्य आहे.
पुढे त्या म्हणतात -
स्वत्व तुझं शोधताना नव्याने
एखाद्या वर्तुळा बाहेर पडतेस का?
वारसा घेतेस अजूनही सीतेचा
पण मनात राधा जपतेस का?'
कवयित्री सखीला स्वत्व शोधताना एखाद्या वर्तुळाबाहेर पडतेस का? असा प्रश्न करतात. मग ही वर्तुळे कुठली आणि कोणती? तर संस्कृती, संस्कार आपण ज्यांना म्हणतो त्यात दोष निर्माण झाल्यामूळे तिच आपली साखळदंड ठरतात. दुसरा मुद्दा आहे साहित्याच्या बाबतीत स्त्रीयांची कविता त्याच पारंपरिक वर्तुळामध्ये घुटमळत राहते. हे वर्तुळ भेदण्याची क्षमता आधुनिक काळात निर्माण झाली पाहिजे.
कवयित्री सौ. पद्मा गोळे त्यांच्या नीहार ह्या काव्यसंग्रहात 'मी माणूस' कवितेत म्हणतात.
"स्री देवी हे तर खोटं
स्त्री सखी हे ही खोटं
स्त्री सुंदर चलनी हुंडी
स्त्री म्हणजे नुसती कुंडी
स्त्री म्हणजे केवळ मांस
शिका-याच्या हातात फास (नीहार पृ. ३५)
बाकी सारे मोहक भास"
स्त्री ही माणूस आहे आणि ती माणूस म्हणूनच जगणार हा विचार पद्माताईंनी आत्मविश्वासाने मांडला.
स्त्रीला संसारात स्थान काय? ती पतिची प्रिय सखी की शोभेची वस्तू ? प्रीती विसरणा-या प्रियकराला ती सांगते ः
"विसरलास तू अन मी झाले
रे केवळ गृह मंदिरभूषा."(नीहार पृ. २५)
अशा प्रकारच्या विषयावर लेखन फार कमी आढळते. स्त्री जीवनात ही वैफल्य आहेत तर साहित्यातही निर्भिडपणे यायला पाहिजेत. असे वर्तुळ भेदून कविता पुढे गेली पाहिजे. ज्योती भारती यांच्या कवितेत हा उपदेश येतो.
त्या स्त्रीला म्हणतात, तू सीतेचे पतिव्रत्य जपतेस पण कधी काळी तुझ्या मनात प्रियकराबद्दल असक्ती निर्माण झाली तर ती 'राधा' राधेचा भाव मूक्तपणे जपतेस का? का तुला ते संस्कारामूळे पाप, चुकीचे वाटते?असे प्रश्न वरील ओळीतून केले आहेत.
कविता आणि स्त्री हे नाते पुरुष प्रधान संस्कृतीने मोठ्या सीताफिने जोडले आहे. आणि स्त्रिया ही हेच वर्तुळ आनंदाने गिरवताना दिसतात. ह्या वर्तुळाला भेदण्याचे सामर्थ्य साहित्यात येणे आवश्यक आहे.
ज्योती भारती पुढे म्हणतात,
लावून झापडं करिअरची
पुरूषी अहं मिरवतेस का?
साज नवाच चढवून तोंडावर
आतली रंभा पुसतेस का?
आधुनिक स्त्री ध्येय, करिअरच्या नावाखाली पुरुष होतेय का? ही सुध्दा भिती येथे कवयित्री व्यक्त करतात. ही तर भविष्याची चाहूल आहे. कदाचित वर्तमान सुध्दा असेल. स्त्रिया आर्थिक स्वावलंबी नव्हत्या त्यावेळेस त्या पुरुषप्रधान संस्कृतीत गुलाम होत्या किंवा आहेत. पण आर्थिक स्वावलंबन आल्यास परत ती पुरुषांवर वर्चस्व गाजवायला पाहतेय का? असाही प्रश्न त्यांची कविता विचारते. स्त्री-पुरुष समानता किंवा स्त्रीवाद हा पुरुष विरोधी नाही तर स्त्रियांचे दास्यत्व झुगारुन नवी समाज रचना अस्तित्वात आणन्यासाठीचा आहे. तेथे स्त्री पुरुष सर्व पातळ्यांवर समान असतील.
पुढच्या ओळीत परत त्या म्हणतात, नवा साज चढवून श्रृंगार करुन. हे सौंदर्य केवळ बाह्य दिखाव्यासाठी करतेस का खरंच तुझ्या मनातील भावसौंदर्यही तु जपतेस? ह्याचे उत्तर ज्याचे त्याने मिळवावे. त्यांची कविता प्रश्न विचारुन मनात घर करते.
सीता, राधा, रंभा हे पौराणिक संदर्भ देण्याचे त्यांचे कौशल्य अपूर्व आहे.
आईपणाने सर्जक होताना
वेणा सोसत लढतेस का?
दुनिये भोवती फिरता फिरता
स्वतःलाही शोधतेस का?
कवयित्री म्हणतात, तुला निसर्गाने आई होण्याचे वरदान दिलेय. आई होताना तुझी कुस सर्जनशीलता दाखवते पण प्रसुतीच्या वेदना सहन करतेस तशा संसारातील वेदनाही आईपणाने सहन करतेस. एवढा त्याग करुनही कधी दुनियाही तू पाहतेस पण कधी अंतर्मुख होऊन तुझे स्वतःचे सुख कशात आहे हे शोधतेस का?
थोडक्यात सांगायचे झाले तर स्त्रीवादी समीक्षेच्या दृष्टीकोणातून सुरुवातीला लेखन करणाऱ्या स्त्रियांनी अध्यात्माची कास धरली पुढे स्वातंत्र्याअगोदर व नंतर कविता अंतर्मुख होऊन तिने स्त्री मनातील विविध भावनांचे पदर उलगडायला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रेमानुभवाचे तसेच मनातील कोलाहल जी स्त्रित्वामूळे निर्माण झाली ती मुक्त पणे कवितेत व्यक्त केली इंदीरा संत व पद्मा गोळे ह्या कवयित्रींच्या काव्यात ती पाहवयास मिळते. सध्याच्या वर्तमानकाळात कविता अधिक स्पष्टपणे भाव मांडते. हे ज्योती हनुमंत भारती यांच्या प्रातिनिधीक काव्यात दिसून येते.
ह्या ही पुढे जाऊन सध्याचे वर्तुळही कवितेला भेदण्याची गरज आहे.
म्हणून म्हणावेसे वाटते,
हम जींदगी लिखते है कलमसे
इसलीऐ के बंदगी खत्म हो जींदगीसे
#सोमनाथ_पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा