शनिवार, २५ एप्रिल, २०२०

पाचही बोटे सारखे नसतात (म्हण)

*****एक म्हण******

"पाचही बोटे सारखे नसतात."

 म्हणी अनुभवाच्या खाणी असे म्हणी बाबत म्हटले जाते ते काही खोटे नाही. याचा अर्थ म्हण समाज जीवनातून सहजपणे निर्माण झालेली नसते. एक तर ज्याच्या अनुभवातून म्हणीचा उगम होतो. ह्या अनुभवामागे त्याचे वैयक्तिक चिंतन तर असतेच पण ह्याला पाठबळ मिळते ते इतरांच्या अनुभवातून आणि म्हण प्रचलित होते. अशी म्हणीची निर्मिती सामाजिक स्वरुपाची सांगता येईल.
    'पाचही बोटे सारखे नसतात,' ह्या  म्हणीचा अर्थाच्या दृष्टीकोनातून जर विचार केला तर सर्व व्यक्तिमत्व सारखे नसतात, असा अर्थ आपण सहज सांगत असतो.
पण ही म्हण निर्माण होण्यामागे अनुभवाची किती सखोलता आणि चिंतनही असते, ह्याचा म्हणीचा वापरकर्ता कधी कधी विचारही करत नाही. कधी तर चुकीच्या ठिकाणी म्हण वापरुन आपले नाकर्तेपणावर पांघरूण घातल्या जाते.
   उदा. एखाद्या शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांना न शिकवीता वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे.  निकाल तयार करणे आणि एखाद्या पालकाने विचारले माझा मूलगा वर्गात एवढ्या कमी स्थानावर किंवा मागे का आहे? अशा ठिकाणी 'पाचही बोटे सारखे नसतात.' म्हणून तुमचा मूलगा मागे असा म्हणीचा वापर करणे यथोचित ठरणार नाही. कारण विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी  शिक्षकांनी प्रयत्नच केलेले नसतात. म्हण मात्र अनुभवातून तयार झालेली असते. अशा मौल्यवान साहित्याची आपण त्याठिकाणी पायमल्ली करत असतो.
     एखाद्या शास्त्रज्ञाने त्याचे पूर्ण जीवन एखादे  अनवस्त्र तयार करण्यासाठी घालवावे, त्याने मानवी कल्याणाचा विचार करून अनवस्त्र तयार करावे व एखाद्या माथेफिरु राष्ट्राध्यक्षाने ते अनवस्त्र सहज एखाद्या देशावर टाकावे. ही शास्त्रज्ञाच्या विचार, त्याग, श्रम व ज्ञानाची हार असते.
   सृजनशील कलावंत असतील, शास्त्रज्ञ असतील ह्यांनी तयार केलेल्या कलाकृतीमागे खूप मेहनत चिंतन व अनुभव असतात पण वापरकर्त्याजवळ त्याचे ज्ञान असेलच असे नाही, ज्ञानाअभावी 'माकडाच्या हाती मशाल.' देण्यासारखी कृती अजानतेपणी घडत जाते. अशावेळेस कलाकृती व विचारांची हार होते.

   थोडक्यात, म्हणीचा योग्य अर्थ असा की अनेक व्यक्तींत सुधारणा करण्याचा प्रयत्न करुन तुम्हाला समोरच्या काही व्यक्तीत अपेक्षित बदल घडून आलेला दिसला पण एखाद्या व्यक्तीत त्याचा प्रभाव शून्य असेल तर "पाचही बोटे सारखे नसतात." असे आपण व्यक्ती तितक्या प्रकृतीचे वर्णन करताना म्हणू शकतो.

- सोमनाथ पुरी
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा