रविवार, १९ एप्रिल, २०२०

बोधकथा

बोधकथा : माकड आणि मदारी

एका गावात एक मदारी रहात होता. तो दररोज माकडाचा गावोगावी जाऊन माकडाचा खेळ करायचा. त्याच्या डमरुच्या तालावर माकड मनेल तसे उड्या मारायचे. हा खेळ लोकांना खूप आवडायचा. त्याच्या खेळाच्या कौशल्यामूळे तो पंचक्रोशीत खूपच लोकप्रिय झाला. तो खेळ करुन जमा केलेल्या पैशात आपल्या गरजा भागवायचा.
  असे खेळ करता करता बरीच वर्षे निघून गेली. त्याच्या वया बरोबरच माकडाचेही वय वाढत होते. तो माकडाची खूप काळजी घ्यायचा. सहाजीकच त्या माकडाला वाटायचे इतर माकडापेक्षा आपण खूप भाग्यवान आहोत, कारण आपला मालक आपल्याला हवे ते खायला आणून देतो. ऊन पावसातही आपली काळजी घेतो. पण माकडाचे वय जसजसे वाढत गेले तसतसे मालकाला काळजी लागली. आता आपले माकड म्हातारे झाले आहे. पहिल्या सारखे खेळही त्याला जमत नाहीत, आणि त्याचे वय झाल्यामूळे त्याच्यात पहिल्या सारखा उत्साहपण राहिला नाही. मग ह्या माकडाला बाजारात विकून आपण नवीन माकड विकत घ्यावे अशी त्याच्या मनात कल्पना आली. 
      एके दिवाशी सकाळी उठून मदारी माकडाला घेऊन जात होता. माकडाला वाटले नवीन ठिकाणी खेळ करायला मालक आपल्याला घेऊन जात आहे. माकडाचा बाजारात जास्त पैसा यावा म्हणून मालकाने त्याला चांगले स्वच्छ केले होते. माकडालाही वाटले मालक आपली फारच काळजी घेत असतो. ह्या उपकाराने माकडाच्या डोळ्यात पाणी आले. 
   माकड आणि मालक जसजसे चालत होते. तसतसे रस्त्याने अनेक प्राणी व त्यांची मालके माकडाला दिसत होती. क्षणात माकडाच्या मनात विचार आला आपला मालक आपल्याला बाजारात तर घेऊन जात नसेल ना. ज्याची कल्पना केली तेच झाले. मदारी जनावरांच्या बाजारात माकडाला घेऊन गेला. 
       एका वट्यावर माकडाला बसवून मदारी ग्राहकाची वाट पहात होता. काही ग्राहक यायचे माकडाला खालून वरुन पहायचे व निघून जायचे. हे पाहून माकडाच्या डोळ्यात पाणी आले. इतके दिवस आपण मालकाची सेवा केली, तो म्हणेल तशा उड्या मारल्या, दोन पायावर उभे राहून कसरती केल्या. आज आपण म्हातारे झालो म्हणून मालक आपल्याला विकत आहे. माकडाला खूप वाईट वाटले.
       ग्राहक लागत नाही पाहून मदारीही वैतागला होता. माकडाला मारुन, शिव्या देऊन त्याचा राग तो काढत होता. मालकाला खूपच वाईट वाटत होते. एक ग्राहक शेवटी मिळाले. माकडाला काही रक्कम देऊन घेऊन जाण्यासाठी मदारी व ग्राहकाचा करार झिला. मालकाने त्या ग्राहकाकडे माकडाला सोपवले. ग्राहक मारत होता. माकडाच्या डोळ्यात पाणी आले. मदारी माकडाच्या मोबदल्यात मिळालेल्या नोटा मोजत होता व खूष होत होता पण त्याने माकडाकडे एकदाही वळून पाहिले नाही. माकडाच्या डोळ्यातून टपटप पाणी वहात होते. नवीन मालकाच्या मागे ते मजबुरीने चालत जात होते. मदा-याचा चेहरा आता मालकाला दिसेनासा झाला. माकड मात्र चालत राहिले....चालत राहिले,....!

तात्पर्य: लोभी माणसे स्वार्थासाठी निष्पाप प्राण्याचा वापर करतात व स्वार्थ पूर्ण होताच त्या प्राण्याला दूर करतात.

#सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा