शुक्रवार, २० मार्च, २०२०

चिऊ चिऊ चिमणी (बालकाव्य)


चिऊ चिऊ चिमणी...

चिऊ चिऊ चिमणी
कुठूण गं आली ?
अंगणातील झाडावर
बसली तु फांदीवर

चिऊ चिऊ चिमणी
काय खाते दिवसभर
देते तुला चारा आणि 
पाणी पी पोटभर

चिऊ चिऊ चिमणी
पंख तुझे किती छान
अंग तुझे मऊ मऊ
कुठे असतात कान?

चिऊ चिऊ चिमणी
चोच तुझी किती छान
सुई सारखे टोक त्याला
उडत फिरतेस पानोपान

चिऊ चिऊ चिमणी
राहतेस कुठे रातभर
कुठे असते बाळ तुझे
तुझ्यावीना दिवसभर

चिऊ चिऊ चिमणी
खोपे करतेस नक्षीदार 
कुठे शिकलीस हे ज्ञान
न जाता शाळेवर

चिऊ  चिऊ चिमणी
येतेस का माझ्या घरा
बाळांना तुझ्या मी
भरवीन  पाणी चारा

चिऊ चिऊ चिमणी
इवले इवले तुझे पाय
जमिनीवर थोडा वेळ
भूर्रकन उडून जाय

चिऊ चिऊ चिमणी
डोळे तुझे गोल गोल
टकामका फिरविते
ऐटीत त्याचा डोल

चिऊ चिऊ चिमणी
झाडावर असते घर
झाड नसते तेंव्हा
हिंडते उन्हात भर


*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा