मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

चाराक्षरी नियम

🌹🙏🏻साहित्य उपक्रम🙏🏻🌹

उपक्रम क्र २ - चाराक्षरी लेखन 

दिनांक : २२-१२-२० ते २६-१२-२०(मंगळवार ते शनिवार)


वेळ : ८-१०

नमस्कार!!🙏🏻🙏🏻

मागच्या आठवड्यात आपण शिरोमणी काव्य शिकलो. सर्वांनी छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार.🙏🏻😊

आता आजपासून आपण बघुया... चाराक्षरी.....तर तयार राहा एक नवीन काव्यप्रकार शिकायला.🙏🏻😊👍🏻

*चाराक्षरी*
        *चाराक्षरी* हा काव्यप्रकार प्रणाली म्हात्रे यांनी निर्मिला आहे. म्हणून हा काव्यप्रकार *' प्रणु* *चाराक्षरी*' या नावानेही प्रचलित आहे. हा काव्यप्रकार अगदी साधा, सोपा, सहज आहे.

*नियम*
१. प्रत्येक ओळीत फक्त चारच वर्ण अक्षर असायला हवेत.
२. कमीतकमी ६ आणि जास्तीत जास्त १० कडवे असावीत.
३. विराम चिन्हांचा आवश्यक त्या तेथे वापर असावा.
४. कवितेला आशय, लय, ताल व व्याकरण योग्य असावे.
५. दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक असावे.
६. यमक हे अंत्यपुर्वी स्वर यमक असावे.
७. ओढूनताणून यमक जुळवू नये.

*स्वर  यमक म्हणजे काय?*
*यमक*
ज्या शब्दांची सुरुवात वेगळ्या अक्षराने होते पण शेवट सारख्या अक्षरांनी होते त्याला म्हणतात यमक.
उदा. असते - नसते

*स्वरयमक*
  यमक जुळणाऱ्या शब्दांत उच्चार करताना सारखा स्वर येणे म्हणजेच *स्वरयमक* होय. 
उदा. फुलला - खुलला
वरील दोन्ही शब्द यमक जुळणारे आहेत. फुलला हा उच्चार करताना ला पूर्वी ल येतो. यामध्ये अ हा स्वर आहे. त्याचप्रमाणे खुलला यामध्ये पण उच्चार करताना अ हाच स्वर येतो. म्हणून खुलला आणि फुलला हे *स्वरयमक* आहेत.

कधीकधी आपण कविता लिहिताना यमक जुळवतो,पण प्रत्येक यमक हा *स्वरयमक* नसतो.
उदा. यमुनेतिरी - चातकापरी 
हे शब्द यमक आहेत पण *स्वरयमक* नाहीत.

मी इथे तुम्हाला  चाराक्षरी चे एक उदाहरण देते. त्यावरून प्रयत्न करून पाहा.

रम्य प्रातः
उगवली,
शुभ्र जाई
उमलली||१||

तिचा मंद 
हा सुवास,
करी धुंद
या मनास||२||

तिचा वर्ण 
शुभ्र सारा,
नभिचाच
शुक्र तारा||३||

तिचे देठ
हे कोवळे,
दिसतसे
गं वेगळे||४||

ती हसते
एकट्यात,
नि गर्दीत 
गजऱ्यात||५||

उमलते
कळीतून,
प्रगतीच्या
पेनातून||६||

ती फूलते 
झाडावर,
प्रगतीच्या 
पानावर||७||
-@प्रगती देशमुख(चंदुले).
    (शब्दसंगिनी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा