🌹🌿🍁🌴🍁🌲🍁🌾🍁🌿🌹
*ललित लेख*
*अलवार चाहुल तुझी*
आजची सकाळ जरा वेगळी भासली. पहाटे साडेपाचचा सुमार, बेसूमार धुके दाटलेले, वातावरण जणू गुलाबाचा गंध घेऊन धुंद होते. रानातील हिरवीगार पिकं आनंदात दवांनी नटली होती. झाडाच्या पानापानांतून दव निसटत जमिनीवर पडे व रामप्रहरी सडा टाकल्यागत भूईवर दवांच्या थेंबाचे अंथरुणच जनू टाकले कोणी असा भास होत होता.गवताची पाती भिजून चिंब झालेली. दोन दिवसाच्या गरमी नंतर आजची सकाळ गुलाबी वातावरणाने प्रसन्न भासत होती.
सकाळचा फेरफटका मारण्यासाठी अशा रम्य वातावरणात आम्हीं निघालो. वातावरणच एवढे अल्हाददायक होते की, त्यात तुझी आठवण येणार नाही तर नवलच. तुझ्या चेह-यावरचे स्मित मला आठवले. नेहमी आनंदी दिसनारी तू , कुठे तरी आत खोलवर एका अनाकलनिय दुःखाचे सावट असेल असे कधी तुला पाहून वाटलेच नव्हते, पण सुखाला दुःखाचा शाप असतो. सुखे कधीच भरभरुन एकटी येत नसतात, तसेच तुझेही झालेले.
चालता चालता हाच विचार मनात घोळत होता. निसर्ग हिरवागार आनंदी दिसतो. पण त्या मागे निसर्गाचेही दुःखाचे संचित असतेच. सर्व उन्हाळा अंगावर झेलतो. तापून तापून जमिनीत उष्णता खोलवर मूरते. मग मृगाचा पाऊस , तो मृदगंध सर्वांनाच हवाहवासा वाटतो. हिरवळीने नटलेली धरा आणि श्रावणातील बरसना-या धारा.. .. असुसलेला वारा...हे सर्व वातावरण आपल्याला एका अलौकिक दुनियेत घेऊन जाते. ज्यांच्या जवळ त्यांच्या प्रिय व्यक्ती असते, ते निसर्गाचा मन मुराद आनंद घेतात व ज्यांच्या पासून कोणी प्रिय व्यक्ती दुरावलेली असते, ते भूतकाळातील आठवणीत रमतात.
अशीच मला तुझी आठवण आली आणि पहिला प्रेमाचा ऋतू आठवला. जीवनभर पुरुन उरेल असे ह्या जगात काहीच नसते, पण माणूस सुखाच्या मागे धावत असतो. जसे हरीन नाभीतील कस्तुरीच्या सुगंधाने उर फुटे पर्यंत धावते.....पण त्याच्या जवळ असलेल्या कस्तुरीची त्याला जानीव नसते.
माणसाचेही तसेच आहे ना.... सुखाच्या मागे आयुष्यभर धाव...धाव धावत असतो, पण सुखी कधीच होत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत चेहऱ्यावर दुःख, आणि काही तरी मिळवलं नाही ह्याची खंत. मृत्यूनंतरही कपाळावरील आट्या त्याच्या अपूर्णतेचे निदर्शन करतात....पण ते पूर्ण सत्य नाही. सुख हे कस्तुरी प्रमाणे आपल्याच मनात असते. फक्त गरज असते दृष्टिकोन बदलण्याची..........!!
~ *सोमनाथ पुरी*
🌹🌿🍁🌿🌺🌴🌺🌲🌺🌿🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा