रविवार, २१ जून, २०२०

बाप



जन्म लेकराचा होतो
तेंव्हा बापं आनंदातं
उत्साहीतं मनं त्याचं
वाटे मिठाई गावातं

ठोका चुके काळजाचा
बापं कासावीसं होतो
आजारातं तो बाळाच्या
दवाखाना ही गाठतो

देतो घेऊनं खेळणे
गरीबीत ही देखणे
हास्यं बाळाचे पाहूनं
दुःखं बापाचे ते उणे

बाळं शाळेमधी जाता
घारीवानी फिरे मनं
क्षणोक्षणी चिंता लागे
येतो आनंद घेऊनं

मोठे होते जेंव्हा मूलं
लागे चिंता भविष्याची
कधी रागावतो बापं
ओढं बाळं कल्याणाची

सोडू नका वृध्दकाळी
मायं बापं ते आश्रमी
त्यागं सुखाचा करुनं
झीजतातं ढोरावानी

- सोमनाथ पुरी

बुधवार, ३ जून, २०२०

आलं आभाळं भरुनं...


आलं आभाळ भरुनं
संगे पावसाच्या धारा
झाडांनाही नाचवीतो
सोसाट्याचा गार वारा

वाटं पहात होते जीव
तापलेल्या उन्हाळ्यातं
पावसांच्या सरींनी त्या
मनं गेले चिंब होतं

गावे आनंदाचे गाणे
नाच थोडा पावसातं
झेलू थेंब पावसाचे
जीभं ओठं पापण्यातं

नाते असे पावसाचे
मनोमनी उल्हासीतं
लता तरु भिजलेल्या
थेंब चमके पानातं

माया जशी आभाळाची
धरणीला ओली भेटं
सुखावली धरा आता
निसर्गाची गळाभेटं

- सोमनाथ पुरी

रिमझीम पाऊस



तुझ्या माझ्या भिजण्याने
सुगंधीत व्हावी ओली माती
पावसात चिंब होताना
थेंबा थेंबाचे व्हावेत मोती

सूर जुळून यावेत पक्षाचे
गावी पक्षाने गीतातून प्रीती 
पुस्तकात आठवणींच्या
जपून ठेवावी आपली नाती

पाऊस बरसताना असावी
तुझी माझी एकच छत्री 
भिजू नये म्हणून आपण
सोडून द्यावी भावना भित्री

तेवढ्यात एक वादळ यावे
उडून जावी आपली छत्री
सुसाट वारा गार जलधारा
झेलीत व्हावी प्रीत खात्री

असे सगळे व्हावे वाटते
स्वप्न कधी तरी बरे वाटते
झोप उडत जाते तेंव्हा
वास्तवाचेही धूके दाटते

- सोमनाथ पुरी

लाईव्ह

लाईव्ह

लाईव्ह येण्याचं आज
फॕड निर्माण झालय
कवितांच्या गोंधळात
कोरोनाचं पिक आलय

कवीतेला घेऊन येतो
तो कवी महान होतो
न येणा-याचं लेखन
जनू धूळखात पडलय

कविताचं स्वागतही
जंगी थाटात होतय
काॕमेंट व लाईकचा
जनू पाऊस पडतोय

मास्क लाऊन मंत्री 
ताळेबंदी करतोय
जो तो हात धुवत
उगी लाईव्ह येतोय

एवढ्यात मात्र एक
काम ते नेक होतय
घरातला पुरुषच
रोज भांडे घासतोय

- सोमनाथ पुरी

मंगळवार, २ जून, २०२०

पाऊस



नीळे सावळे घन नभी
डोकावून गेले गगनी
बरसून कण जलाचे
शहारुन गेले तनमनी

पेरीत गेलो अत्तर मनातले
सुगंधही थोडा दरवळला
उडून गेला तो वा-यावरती
नभातील चंद्रही मावळला

एक वीज कोसळली
ध्यानी मनी नसताना
छेद हृदयी देऊन गेली
काहीच चूक नसताना

कुंडलीतही होता मंगळ
स्वभावही जुळले नाही
चंद्र आणि वसुंधरेतील
अंतर काही मिटले नाही

तनात भिंगरी मनात भिंगरी
स्थिर कसा भाव व्हावा
येणे जाणे गुणधर्म मूळीचा
एकच कसा गाव रहावा

- सोमनाथ पुरी