सोमवार, १४ एप्रिल, २०२५

अक्षर छंद

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*वृत आणि गझल अभ्यास*
*विजो (विजय जोशी)*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
      *भाग : अक्षरच्छंद*
 ---------------------------------
# ज्या काव्य रचनेत चरणातील / ओळीतील अक्षरांची संख्याच फक्त निश्चित असून, वृत्ताप्रमाणे मात्रा किंवा अक्षरांचा लघुगुरू क्रम निश्चित नसतो अशा रचनेला अक्षरच्छंद रचना म्हणतात.

वरील विधानावरून अक्षरच्छंद रचनेबद्दल पुढील गोष्टी स्पष्ट होतात :
- चरणातील (ओळीतील) अक्षरांची संख्या निश्चित असते.
- चरणातील (ओळीतील) मात्रा संख्येचे बंधन नसते (जे मात्रावृत्तात असते).
- चरणात अक्षरांच्या लघुगुरू क्रमाचेही बंधन नसते (जे अक्षरगणवृत्तात असते).
- चरणांमध्ये (ओळींमध्ये) लयबद्धता असणे आवश्यक.

# अक्षरच्छंदामध्ये ओळीतील सर्व अक्षरे गुरू समजली जातात. सर्व अक्षरांचा उच्चारही गुरू/दीर्घ करायचा असतो. ओळीतील अक्षरसंख्या ठराविक असणे एवढाच तांत्रिक निकक्ष आणि लयबद्धता हा सौंदर्य निकष अक्षरच्छंद रचनेत सांभाळला जातो. त्यामुळे वृत्तातील रचनेपेक्षा अक्षरच्छंदातील रचना लिहिणे त्यामनाने सोपे आहे. ओवी व अभंग हे सर्वात जुने आणि लोकप्रिय अक्षरच्छंद प्रकार आहेत. ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास या संतांनी आपल्या रचना मुख्यत्वे ओवी या अक्षरच्छंद प्रकारात लिहिल्या. जवळपास सर्वच संतांनी अभंग हा अक्षरच्छंद प्रकार हाताळला. पण नामदेवांना अभंगाचा प्रणेता मानतात, तर तुकारामांनी अभंग हा प्रकार लोकप्रिय केला. ओवी आणि अभंग या दोन्ही प्रकारात पुष्कळसे साम्य असले तरीही रचनेच्या बाबतीत अभंग हा अधिक काटेकोर आहे. तर ओवीची रचना शिथिल आहे. 
चरणांतील (ओळीतील) अक्षरसंख्या निश्चित असलेल्या रचना उदा. अष्टाक्षरी, दशाक्षरी, बाराक्षरी... इ. या सुद्धा अक्षरच्छंदाचाच प्रकार आहेत.

# अक्षरच्छंद रचनेतील काही प्रकार आणि त्यांची माहिती पुढील प्रमाणे ;

# *अभंग* :
- *मोठा अभंग* : मोठ्या अभंगात चार चरण असतात. पहिल्या तीन चरणात सहा अक्षरे आणि चौथ्या चरणात चार अक्षरे असतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणांच्या शेवटी यमक साधला जातो.
उदाहरण -
"पर उपकारे | नित्य आचरावे |
मोक्ष मार्गी जावे | आनंदाने ||"

काहिवेळा पहिल्या तीन चरणांतही यमक साधला जातो.

- *छोटा/लहान अभंग* :
लहान अभंगात दोन चरण असतात. प्रत्येक चरणात सामान्यतः आठ अक्षरे असतात. दोन्ही चरणांत यमक असतो.
उदाहरण -
"जे का रंजले गांजले |
त्यासी म्हणे जो आपुले ||

तोची साधू ओळखावा |
देव तेथेची जाणावा ||"

काहीवेळा क्वचित पहिल्या चरणात सहा किंवा सात अक्षरे असतात. दुसऱ्या चरणात क्वचित नऊ किंवा दहा अक्षरेही असतात. 

* *ओवी* :
ओवी या छंद प्रकारात चार चरण असतात. पहिल्या तीन चरणांच्या शेवटी यमक असते. ओवीमध्ये चरणांतील अक्षरांचे बंधन शिथिल असते. पहिल्या तीन चरणांत प्रत्येकात पाच पासून पंधरापर्यंत अक्षरे असतात. चौथ्या चरणात पहिल्या तीन चरणांतील अक्षरांपेक्षा कमी अक्षरे असतात. संत परंपरेतील ओव्या अशा प्रकारच्या आहेत. अलिकडच्या काळात ओव्यांमध्ये प्रत्येकी आठ अक्षरांचे चार चरण असून, दुसऱ्या आणि चौथ्या चरणांमध्ये यमक असते -
उदाहरण -
"मन वढाय वढाय |  उभ्या पिकातलं ढोरं |
किती हाकला हाकला |  फिरी येतं पिकावरं ||"
- बहिणाबाई (८-८-८-८)

"आता विश्वात्मके देवें| येणे वाग्यज्ञें तोषावें|
तोषोनी मज द्यावें| पसायदान हे ||"
- संत ज्ञानेश्वर (८-८-७-६)

* *अष्टाक्षरी* :
प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या आठ असते.
प्रत्येक ओळीची सुरवात दोन / चार / सहा अशा समअक्षरी शब्दानेच होणे आवश्यक.
प्रत्येक दोन चरणांत किंवा दुसऱ्या आणि चौथ्या चरणांत यमक साधणे अपेक्षित आहे -
उदाहरण - 
"नाही दिवाळी दसरा
कधी उपाशी जागर,
जेव्हा मिळे पोटभर
तोची आनंद सागर !!"
(दशाक्षरी, बाराक्षरी हे सुद्धा याच स्वरूपाचे अक्षरच्छंद प्रकार आहेत).
--------------------------

▪️▪️▪️
@ विजो (विजय जोशी)
डोंबिवली 
९८९२७५२२४२