🚩🔶🚩🔶🚩🔶🚩🔶🚩🔶🚩
*शब्दरजनी साहित्य समूह*
*आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम पोवाडा काव्य लेखन*
*सराव कार्यशाळा* ( दोन दिवस सराव उपक्रम )
*विषय :- छत्रपती शिवाजी महाराज*
*दिनांक :- १७/०२/२०२१ - १८/०२/२०२१*
*माहिती--पोवाडा*
* पूर्वी राजांच्या पदरी त्यांची स्तुती करणारे राजकवी किंवा भाट असत;पण ते राजदरबारात.
* शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा प्रजेमधे आपला राजा, आपले राज्य ही भावना निर्माण व्हावी म्हणून राजाच्या शौर्याचे,राजाचे गुणवर्णन करणारे भाट (शाहीर) गावोगावी जाऊन राजाने किंवा सरदाराने एखादी मोहीम फत्ते केली की त्याचे वर्णन करू लागले.
(हे तेव्हाचे प्रसिद्धी अधिकारी)
* ह्या गुणांच्या, प्रसंगाच्या काव्यात्मक वर्णनाला पोवाडा म्हणतात व रचणाऱ्याला, गाणाऱ्याला शाहीर म्हणतात.
* वास्तविक पोवाडे हे पद्यात्मक गद्यच आहे. फक्त गद्यातल्या प्रत्येक ओळीला यमकात बसवले की झाला पोवाडा तयार.
* म्हणून पोवाडा रचायला एकदम सोप्पा काव्यप्रकार.
* जसे गद्यामधे एका मुद्याचा एक परिच्छेद असतो आणि तो कितीही ओळींचा असू शकतो तसेच पोवाड्यामधे एका मुद्याचा एक चौक असतो,तो कितीही ओळींचा असू शकतो.
(समजा पहिला चौक पाच ओळींचा तर दुसरा चौक आठ ओळींचा तर तिसरा चौक चारच ओळींचा असू शकतील)
* प्रत्येक चौकाचे यमक वेगळे असलेले चालते.
* एक चौक झाला की पालूपद म्हणायचे(जी -जी-रं-जी)
* पोवाडा म्हणजे फक्त कविता नाही तर ते नाटकही असतं. शाहीर पोवाडा गाताना अभिनय, आवाजात चढउतार करतो त्यामुळे तो अधिक प्रभावी होतो.
पोवाडा गाताना मधेच सरळ वाक्य बोलले तरी चालते.
* पोवाडा गाताना डफ आणि तुणतुणे ही वजनाला हलकी व हाताळायला सोपी अशी दोन वाद्ये वाजवतात. तसेच शाहिराची री ओढायला कोरस असतो.
* वरील नियम सिद्ध करणारी उदा. देते.
1) नाव त्याचं अफजलखान
जिता जागता हो सैतान
तो बोलला छाती ठोकून
शिवाजीला टिकतो चिरडून
2) विजापूरचा अफजलखान
शिवाजीला करण्या हैराण
किंवा त्याचा घ्यावया प्राण
पैजेचा विडा उचलून
आला प्रतापगडावर जाण
पण अफजलखानाला शिवाजीराजानं
कायमचा बशिवला कबर बांधून
जी जी जी जी
* या दोन्ही चौकात वर्णन एकच आहे; पण पहिल्या चौकात चार ओळी मग पालुपद; तर दुसऱ्या चौकात सात ओळी मग पालुपद आहे.
* कुठच्याही ओळीत मात्रा किंवा अक्षरसंख्या सारखी नाही.
* एकच ओळ आपण परत परत लिहू शकतो. उदा.
संताजी धनाजी यांची घडली खरी कहाणी
नाव ऐकता वैऱ्याचे घोडे नव्हते पित पाणी
असे झालेच नाही कुणी,असे होणार नाही कुणी
जगी झालेच नाही कुणी, जगी होणार नाही कुणी.
शेवटच्या दोन ओळी परत परत आल्या आहेत.
* तेव्हा माईक नव्हते शाहिराला त्यामुळे व विरश्रीयुक्त बोलायचे म्हणून मोठ्याने गायला लागायचे,त्याला दम खाता यावा म्हणून कोरस असतो तसेच गद्यही असते.
उदा.कल्याणच्या खजिन्यात
लुटीस एक मान
लाभली रूपाची खाण
सूभेदाराची तरूण सून
(आता गद्य)
मोगलांनी आपली धनदौलत लुटली,
आया बहिणींची अब्रू लुटली;पण शिवाजीराजे तसे नव्हते,परस्त्रीला ते मातेसमान मानणारे होते.
(परत पोवाडा सुरू)
पण तिच्या पूढे नमुनी मान
मानुनी तिला माते समान
असा राजा चारित्र्यवान
जी जी जी रंं जी
* पोवाडे सर्वसामान्यांसाठी असल्याने त्यात भाषा सौंदर्य, अलंकार काही नसते.उलट सर्वसामान्य भाषा वापरायची.
* आता तुम्ही पोवाडा कसा रचाल?
शिवाजीमहाराजांच्या जीवनातील कोणताही एक प्रसंग घ्यायचा. तो प्रसंग गद्यामधे लिहायचा. मग प्रत्येक ओळीत यमक येईल अशी शब्दरचना करायची.
* अगदी एक चौक लिहिला तरी चालेल. जास्तीत जास्त चारच चौक लिहा.
* उदा.
प्रथम गद्यात परिच्छेद लिहिला.
(हा समुहात पाठवायचा नाही)
* औरंगजेबाने मोठा फौजफाटा घेऊन शाहिस्तेखानाला दक्षिणेकडे शिवाजी महाराजांना नष्ट करण्यासाठी पाठवले एके रात्री शिवाजी महाराजांनी हल्ला त्याच्यावर केला,त्यात शाहिस्तेखानाची बोटं कापली गेली.शाहिस्तेखान पळाला.
ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकली आहे.
* याचे चार चौक करता येतील.
1) त्याच्या फौजफाट्याचे वर्णन
2) शाहिस्तेखानाचे वर्णन
3) घटनेचे वर्णन
4). राजाचा पराक्रम
पोवाडा
शाहिस्तेखानाचा फौजफाटा प्रचंड कसा तो पहा.
त्याचं घोडदळ, पायदळ
फौजफाटा लई बक्कळ
जित्या हत्तीचं बळ
पहाणारा कापतो चळचळ
जी जी जी जी
हा शाहिस्तेखान म्हणजे औरंगजेबाचा मामा,मोठा कपटी आणि पराक्रमी.
नाव त्याचं शाहिस्तेखान
जिता जागता जणू सैतान
तो बोलला छाती ठोकून
शिवाजीला टाकतो चिरडून
भली मोठी फौज घेऊन शाहिस्तेखान दक्षिणेच्या दिशेने निघाला.
मग दिल्लीहून तडफेन
40हजार फौज घेऊन
आला मामा शाहिस्तेखान
पुण्यामधे कडक शिस्तीनं
बसला तळ ठोकून
जी जी जी जी
शिवाजी महाराजांकडे एवढा फौज फाटा नव्हता.त्यांनी बेसावध शाहिस्तेखानावर एके रात्रीचा हल्ला केला.
पण त्याला शिवाजी राजानं
अचानक रात्री गाठून
घेतली बोटं कापून
जीवावरील संकट बोटावर भागून
शाहिस्तेखान पळाला पुणे सोडून
जी जी जी जी
* तुम्हाला शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका घटनेवर पोवाडा रचून समुहात दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे.
* प्रत्येकीने प्रयत्न करून पहायचा. या सारखं सोप काहीच नाही.
* कमीतकमी एक चौक,जास्तीत जास्त चार चौक पाठवू शकता.
* काही तरी नवीन करतो तेव्हा आपल्याला वेगळाच आनंद मिळतो. तो आनंद मिळवा.
*महत्त्वाची टिप:- सराव कार्यशाळा उपक्रमाचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही*
========================
*कवयित्री नंदीनी सुकाळे*
*कवी मयूर पालकर*
*कवयित्री श्वेता उदमले*
*समूह आयोजिका*
*कवयित्री अनिता आबनावे*
*समूह संस्थापक*
*शब्दरजनी साहित्य समूह*
*समस्त साहित्यिक परीवार*
🚩🔶🚩🔶🚩🔶🚩🔶🚩🔶🚩